सिग्नल

आज रविवार... सुट्टीचा दिवस. सुट्टी म्हणल्यावर आज ही नेहमीप्रमाणे उठायला उशीर झालेला. पावसाळ्याचे दिवस होते. डोळे चोळत चोळत बाल्कनी मध्ये गेलो. बाहेर एकदम भयानक वातावरण झालेलं. आभाळ भरून आलेलं. काळेकुट्ट ढग पळत होते एकामागे एक. मधेच एखादा ढग धप्पा घालत होता पुढच्या ढगाला, तर मधेच एखादा अप्पर डिपर देत होता. बाल्कनी मध्ये बसून चहाचा एक एक घोट घेत जुन्या आठवणीत रमून जावं असच काहीतरी वातावरण होतं ते. तेवढ्यात लक्षात आलं, अरे!! आपण तर बॅचलर आहे आणि मित्र मित्र शेअरिंग फ्लॅट मध्ये राहतो. आणि असही इकडे चहा येतोच कोणाला बनवायला? मग काय लगेच एका मित्राला उठवल आणि फटाफट आवरायला सांगितलं. रविवार म्हणाल्यावर टिफीन ला सुध्दा सुट्टी  पाहिजेच की आठवड्याची. त्यामुळं येता येताच जेवणासाठी पण काहीतरी पार्सल घेऊन यावं म्हणून घाई घाईने आम्ही निघालो.
खाली येऊन बाईक ला स्टार्टर मारला तेवढ्यात लक्षात आलं, पेट्रोल तर संपत आलंय. पेट्रोल ने जरी शंभरी पार केली असली तरी आम्ही दोघे पण 'तू २० च टाक मी २० च टाकतो ' संघटनेचे कार्यकर्ते. बाईक डावी उजवी कडे हलवून पेट्रोल चा अंदाज घेऊन आम्ही निघालो. पुढे एका टपरीवर मस्त कडक चहा घेतला तेव्हा कुठं आत्मा थंड झाला. पाऊसाने पण आता झिरझिर चालू केली होती. बाजूलाच असलेल्या हॉटेल मधून दाल खिचडी पार्सल घेतली आणि माघारी निघालो. माघारी जाता जाता एक सिग्नल लागलाच. सिग्नल च्या बाजूलाच पेट्रोल पंप होता त्यामुळं तोपर्यंत पेट्रोल तरी भरून होईल म्हणून पेट्रोल पंप वर बाईक घेतली. तेवढ्यात एकच कडकडाट... आणि धो धो पाऊस चालू झाला. सिग्नल वरच्या सगळ्या बाईक वाल्यांची धावा धाव चालू झाली. काहींनी आडोसा बघून बाईक उभ्या केल्या तर काहींनी बॅग मधून मागच्या वर्षीचा रेनकोट काढला आणि त्यात या वर्षीच वाढलेलं पोट दाबून बसवण्याचा प्रयत्न करू लागले. फोर व्हीलर मात्र ऐटीत उभ्या होत्या. पुढच्याच क्षणाला असं एक दृश्य दिसलं जे मनाला चुटपुटा लावून जाणारं होतं. लालबुंद सिग्नल, धो धो कोसळणारा पाऊस, सगळं कसं स्तब्ध झालेलं आणि त्यात त्या एकट्याची चाललेली धावपळ.
साधारण ३५-४० वय असेल. सडपातळ बांधा, अंगावर कॉलर कुरतडलेला पिवळ्या रंगाचा शर्ट, त्याच पण एक बटण तुटलेलं. ठिगळं लावून शिवलेली पँट, खाली पायात तारेने बांधलेली चप्पल. चेहऱ्यावर तुरळक सुरकुत्या, हातावरच्या स्पष्ट दिसणाऱ्या नसा,  पावसानं धरलेला जोर आणि अशा पावसात त्याची जगण्यासाठी ची चाललेली धडपड. हातातलं खेळणं विकलं जावं म्हणून या गाडी कडून त्या गाडीकडे चाललेली धावपळ. या केविलवाण्या दृष्याबरोबर दिसत होती ती त्याची परिस्थिती ला लढा देण्याची जिद्द.
सिग्नल सुटला. गाड्या सुसाट निघाल्या.तो ही भिजला होता त्यामुळं पेट्रोल पंप च्या आत येऊन खेळणं विकू लागला. तेवढ्यात दोन लेकरं, एक मुलगा आणि त्याची छोटी बहीण आमच्या जवळ आली आणि पैसे मागू लागली. त्या पोरानी हाल्फ चड्डी आणि काखेत फाटलेला टी शर्ट घातलेला आणि त्या मुलीने पाठीवरची चेन तुटलेला गुडघ्या एवढा झगा. हात पायावर ओघळ आणि नाकाला लागलेली शेंबडाची धार असा एकंदर अवतार झालेला. ते दोघं पैसे मागतायत हे बघून तो माणूस पळत आला आणि त्या पोराच्या पाठीत जोरदार धपाटा दिला. ते पोर जागेवरच कळवळल.
'कितनी बार बोला है पैसे नहीं मांगना'
त्याच हे वाक्य खूप छोटं होतं पण त्याचा अर्थ खूप मोठा. जरी पैशान गरीब असला तरी संस्कारानं खूप श्रीमंत होता तो.
त्या पोराचं रडणं आम्हाला बघवल नाही. आम्ही त्या पोराला उचलून घेतलं आणि खिशातून एक चॉकलेट काढून दिलं. चॉकलेट बघून ते एवढं खुश झालं की त्याला बघून कोणीही आपलं सगळ दुःख विसरून जाईल. नंतर त्याला भूक लागली आहे का विचारलं तर त्याने बापकड बघून नुसतीच मान हलवली. आमच्या कडची दाल खिचडी त्या दोघापुढ ठेवली बघता बघता दोघांनी त्यावर ताव मारला.
तेवढ्यात सिग्नल लागला आणि तो पुन्हा खेळणी विकायला निघून गेला. तेव्हा एक वाक्य आठवलं, कुठंतरी वाचलं होतं. 'साहब आपके खेलेंगे तो हमारे खायेंगे'. आज प्रत्यक्षात अनुभवत होतो.
पाऊस बाहेर पडत होता, डोह मात्र डोळ्यात साचला होता. खरं तर तो धपाटा त्या लेकराच्या पाठीत नव्हता. तो धपाटा होता तुमच्या माझ्या सारख्याच्या पाठीत. जो म्हणतो माझ्या आई बापाने माझ्यासाठी केलंच काय त्याच्या पाठीत तो धपाटा होता.जो म्हणतो माझं नशीबच फाटक आहे त्याच्या पाठीत तो धपाटा होता. कारण त्या फाटक्या नशिबापेक्षा तो फाटका टीशर्ट बरंच काही सांगत होता. तुटलेल्या स्वप्नापेक्षा ती तुटलेली चप्पल जास्त काही शिकवणारी होती. एक माणूस म्हणून गरीब असेलही कदाचित तो, पण एक बाप म्हणून खूप श्रीमंत वाटला मला. चैनीच्या वस्तू नसतील पुरवता आल्या त्याला पण  जगण्याची तत्व मात्र शंभर टक्के पुरवत होता.
एव्हाना पाऊस आता थांबला होता आणि तात्पुर्ती का होईना त्या लेकरांची भूक सुध्दा. मात्र चालू होतं ते फक्त द्वंद...सिग्नल आणि त्या बापामधलं.

Comments

  1. आयुष्याची शिदोरी देणारे वडील..👌

    ReplyDelete
  2. संस्कार जपणारा गरीब पोरांचा श्रीमंत बाप...

    ReplyDelete
  3. जगण्याची जिद्द ....🙌🙌खूप सुंदर आणि डोळ्यातून अश्रूंचा थेम्ब पडेल अशी कहाणी 🌟🌟😇

    ReplyDelete
  4. एक गोष्ट नक्की की,बापाकडे पैसा कमी असला तरी बापाची मेहनत कधीच कमी नसते. बाप कसाही असो त्याच असणं महत्वाच असत..

    खरचं खुप छान लेख आहे.. रोहन दादा😊👌

    ReplyDelete
  5. "त्या फाटक्या नशिबापेक्षा तो फाटका टीशर्ट बरंच काही सांगत होता. तुटलेल्या स्वप्नापेक्षा ती तुटलेली चप्पल जास्त काही शिकवणारी होती. एक माणूस म्हणून गरीब असेलही कदाचित तो, पण एक बाप म्हणून खूप श्रीमंत वाटला मला "
    Very nicely written🌟

    ReplyDelete
  6. Chan. Chotya goshti tun barch moti shikavan det aahe.

    ReplyDelete
  7. छान लेख ...
    अप्रतिम. 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  8. सुंदर.... क्या बात ☺️

    ReplyDelete
  9. Very Nice Rony. Please going keep it up...!!!

    ReplyDelete
  10. Nice.. 😇 shahare ale angavr story read krtana..

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. asa vatla janu me suddhha tethech ha prasangh anubhavat hoto, changli recommendation hoti Atharv chi..., khup chaan storytelling aahe tumchi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पता नहीं

ती...